राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव धूतपापेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या अरुंद व तीव्र उताराच्या रस्त्यावर मंगळवारी एका चारचाकी वाहनाचा अपघात घडला. रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन थेट कडेला असलेल्या गटारात अडकल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेमुळे मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राजापूर शहरालगत असलेले हे मंदिर राज्यभर प्रसिद्ध असून वर्षभर भाविकांची मोठी गर्दी येथे होत असते. शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून मंदिर परिसराचे जतन व सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत भाविकांसह पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
मात्र शहरातून मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद आणि तीव्र उताराचा असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. बाहेरून येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने लहान-मोठे अपघात घडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
अलीकडेच महाशिवरात्र उत्सवानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. अरुंद रस्त्यामुळे मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर वाहने उभी करून भाविकांना पायी जावे लागले. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली होती.
मंगळवारी गणेश मंदिराजवळील वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने एका भाविकाची गाडी गटारात कलंडली. स्थानिक ग्रामस्थ व अन्य भाविकांच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















