रत्नागिरी : शहरात 57 पैकी केवळ 8 कॅमेरे सुरू, सीसीटीव्ही दुरुस्त न करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहरात ५७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले होते. मात्र, त्यातील केवळ सात ते आठच सुरू आहेत. याबाबत एजन्सीला वारंवार सांगूनही त्यांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.


जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून रत्नागिरी शहरात ५७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याद्वारे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवता येते. एखादा गुन्हा घडल्यास किंवा अपघात झाल्यास या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होते. सुरुवातीला हे सर्व कॅमेरे सुरू होते. या सर्व कॅमेऱ्यांचा कंट्रोल मुख्यालयात आहे. मात्र, आता बहुतेक कॅमेरे बंद आहेत.


याबाबत संबंधित कंपनीला दुरुस्तीसाठी वारंवार सांगण्यात येत होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांची कमिटी बसविली आहे. यानंतर या एजन्सीने काही कॅमेरे दुरूस्त केल्याचा अहवाल दिला आहे.

मात्र, त्याचीही पूर्णपणे चौकशी करून ते खरोखर दुरुस्त झाले आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी करूनच खातरजमा करण्यात येणार असल्याचे बगाटे आणि महामुनी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *