दापोली : नगराध्यक्षांकडून दापोलीतील कामांचा आढावा, दापोली-खेड महामार्गावरील कामाची प्रत्यक्ष पाहणी

banner 468x60

दापोली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दापोली-खेड महामार्ग रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची तसेच या मार्गालगत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाची आज लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.


दापोली शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता वाहतूक ताण आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे. तसेच व्यापारी, शैक्षणिक व पर्यटन क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.महामार्गालगत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील नागरिकांना मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम करताना रस्त्याची हानी होऊ नये तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.


यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, पाणी सभापती रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक प्रकाश साळवी, नगरपंचायत अभियंता सुनील सावके तसेच नगरपंचायत कर्मचारी स्वप्निल महाकाल उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी कामाची गुणवत्ता, गती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची पाहणी करत संबंधित विभागाशी चर्चा केली. कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत ठोस नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच नागरिकांच्या सूचनांनाही प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी ही कामे अत्यंत आवश्यक असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ती यशस्वीपणे पूर्ण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *