रत्नागिरी : दक्षिण भाजप जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव यांची नियुक्ती

banner 468x60

भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, दापोली वगळता इतर भागात भाजपची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. विशेषतः चिपळूणमध्ये पक्षाच्या यशात प्रशांत यादव यांचे नेतृत्व निर्णायक ठरले.

banner 728x90 banner 728x90

प्रशांत यादव हे जिल्ह्यातील अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी अलीकडील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)कडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांना कडवी झुंज दिली होती. या लढतीमुळे त्यांचे नेतृत्व केवळ चिपळूणपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात अधोरेखित झाले.

भाजपमध्ये प्रवेशानंतर थेट जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने रत्नागिरी दक्षिण भागात पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशांत यादव यांचा सहकार व सामाजिक क्षेत्रातील अनुभवही मोठा आहे. वाशिष्ठी डेअरीचे उत्पादन कोकणात लोकप्रिय झाले असून, त्यातून त्यांची संघटन क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य अधोरेखित होते.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी नियोजनबद्ध प्रचारातून जनमत आपल्या बाजूने वळवले होते. त्याच कार्यपद्धतीचा उपयोग आता भाजपला तळागाळात पोहोचण्यासाठी होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी ग्रामीण भागातील विकासाच्या प्रश्नांना चालना मिळेल आणि भाजपची ताकद अधिक प्रभावीपणे वाढेल, असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *