रत्नागिरी : येथे कौटुंबिक वादातून आईसह मुलाने घेतला गळफास

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आई आणि मुलाने एकाच वेळी गळफास घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ३३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, ५८ वर्षीय आईची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. या घटनेमुळे पावस दशक्रोशीत मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दत्ता मारुती पाटील (वय ३३, रा. नातुंडे) असे मृत तरुणाचे नाव असून, शारदा मारुती पाटील (वय ५८) असे अत्यवस्थ असलेल्या मातेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता पाटील हा आपल्या आई, पत्नी आणि मुलांसह मुंबई येथे वास्तव्यास होता. त्याचे वडील मारुती पाटील हे नातुंडे येथील मूळ गावी एकटेच राहायचे. दोन दिवसांपूर्वी मारुती पाटील यांचे निधन झाले, त्यामुळे दत्ता आपल्या संपूर्ण कुटुंबासह अंत्यविधीसाठी गावी आला होता. घरात वडिलांच्या निधनामुळे आधीच शोकाकूल वातावरण असताना, बुधवारी दुपारी १ च्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे पत्नी आणि आईसोबत जोरदार भांडण झाले. हा

वाद विकोपाला गेल्यानंतर दत्ताने घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि अंगणातील लोखंडी बारला गळफास घेतला. घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने पत्नीने आरडाओरडा सुरू केला. तिची आर्त किंकाळी ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि दत्ताला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे, मुलगा बाहेर गळफास घेत असतानाच, घरात असलेल्या आईनेही वादातून टोकाचे पाऊल उचलले. शारदा

पाटील यांनी घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने खाली उतरवले, मात्र त्या बेशुद्ध होत्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *