कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिमगोत्सवासाठी हजारो कोकणवासी आवर्जून गावी जातात. शिमगोत्सव, होळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुमारे १९८ जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत असल्याचे म्हटले जात आहे.
होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. होळीनिमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागांतून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ठाण्यातून ७९ फेऱ्यांचे नियोजन असून, मुंबई विभागातून ६२ फेऱ्या नियोजित आहेत. २५ फेऱ्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या होणार असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ९१ फेऱ्या, तर १ मार्च रोजी ५९ फेऱ्या नियोजित केल्या आहेत, असे समजते.
दरम्यान, होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एसटी प्रशासनाने या दिवसांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एकूण १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या गट आरक्षणासाठी राखीव आहेत. एसटी महामंडळाच्या या नियोजनामुळे होळीच्या सणात होणारी संभाव्य गैरसोय टळणार असून, प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. होळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांकरीता ‘लालपरी’ सज्ज झाली आहे, असे म्हटले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















