सावर्डे येथील जुन्या पोलिस ठाण्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अक्षरशः उडवल्याने भीषण अपघात घडला. या धडकेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृताच्या चेहऱ्याचा भाग पूर्णतः विद्रूप झाला. ही दुर्घटना दुपारच्या सुमारास घडली.
या अपघातात आनंद सुंदर हेबरम (वय १७, मूळ रा. झारखंड) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो सावर्डे परिसरात मजुरीसाठी आलेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या वेळी तो रस्ता ओलांडत असताना भरधाव कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर मदत करण्याऐवजी कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर जाऊन कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेण्यात यश आले. प्रांजळ अजय बिर्ला (रा. मध्यप्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
घटनेनंतर परिसरात संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सावर्डे परिसरात भरधाव कंटेनर व अवजड वाहनांच्या वाढत्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निष्काळजी व बेदरकार वाहनचालकांमुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत असून अशा चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासन व पोलिसांनी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















