चिपळूण : फातिमा मुकादमचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, कतारच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील गोवळकोटची सुपुत्री फातिमा खालिद मुकादम हिने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कतारच्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात (Qatar Senior Women’s Cricket Team) स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

banner 728x90 banner 728x90

फातिमाचे हे दणदणीत पदार्पण चिपळूणसह संपूर्ण कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले असून, तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर जागतिक क्रिकेटच्या नकाशावर चिपळूणचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या असलेल्या फातिमाने आज झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून आपल्या कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली. मध्यमगती गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज अशा अष्टपैलू भूमिकेतून तिने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे.

फातिमाचे वडील मूळचे चिपळूणमधील गोवळकोट गावचे असल्याने, या यशाची बातमी धडकताच पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले आहे. अत्यंत कमी वयात कतारसारख्या देशाच्या मुख्य संघात खेळण्याची संधी मिळवणे, ही तिच्या कष्टाची आणि जिद्दीची पावती मानली जात आहे.


फातिमाच्या या यशाने कोकणातील ग्रामीण भागातील मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल चिपळूणमधील क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था आणि सर्व स्तरातील नागरिकांकडून तिचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिक चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *