रत्नागिरी : बसमध्ये तरुणीचा पाठलाग करून छेडछाड; पोलिसांची तत्काळ कारवाई

banner 468x60

बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून, तिचे चोरून फोटो काढणाऱ्या एका नराधमाला रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही वेळातच बेड्या ठोकल्या. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः या घटनेची दखल घेत पीडित तरुणीची भेट घेतली आणि पोलिसांना तपासाचे आदेश दिले.

दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी बारावीची परीक्षा संपवून रत्नागिरी बस स्थानकावरून बसने घरी जात होती. दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटल बस स्टॉप येथे एक इसम बसमध्ये चढला. त्याने जाणीवपूर्वक तरुणीचा पाठलाग केला आणि तिच्या शेजारी बसून तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली.

या प्रकाराची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडित तरुणीशी संवाद साधून तिला धीर दिला आणि घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश या कृतीतून प्रशासनाने दिला आहे.


पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८(१) आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *