दापोली : चांदीच्या विटा तस्करीतील फरार आरोपीला 34 वर्षांनंतर अटक

banner 468x60

दापोली तालुक्यातील वेळास येथील बाणकोट खाडीत १९९१ साली उघडकीस आलेल्या चांदीच्या विटा तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला तब्बल ३४ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. जॉन पॉलोज अब्राहम उर्फ जॉन दाढी (वय ८३, रा. कुलाबा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने नुकताच रत्नागिरी सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज केला होता.

banner 728x90 banner 728x90


सुनावणीनंतर न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची जामीनावर मुक्तता केली.जुलै १९९१ मध्ये भारतीय तटरक्षक दल (कोस्ट गार्ड)यांनी वेळास बाणकोट खाडी परिसरात अल अझहर नावाच्या जहाजावर कारवाई केली होती. या जहाजातून २८६ चांदीच्या विटा तसेच इतर प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला होता.


तपासादरम्यान ही संपूर्ण कारवाई तस्करीसाठी असल्याचे निष्पन्न झाले होते. संबंधित जहाजावर पाच पाकिस्तानी नागरिक आढळून आले होते.या प्रकरणात जॉन हा महत्त्वाचा आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.जहाजावरील माल उतरविणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचेही समोर आले होते.


या प्रकरणात जॉनला १९९२ साली न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.मात्र खटल्यात शिक्षा होण्याच्या भीतीने तो त्यानंतर फरार झाला होता.उर्वरित आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविण्यात आला.
पाच पाकिस्तानी नागरिकांविरोधात चालविण्यात आलेल्या खटल्यात १५ जानेवारी १९९६ रोजी न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते. दरम्यान जॉनला वारंवार समन्स पाठविण्यात आले मात्र तो गैरहजर राहिल्याने त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.


अखेर पोलिसांनी जॉनला अटक करून रत्नागिरी न्यायालयात हजर केले.त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या दरम्यान जॉनच्या वतीने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला.
जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान जॉनच्या वतीने सांगण्यात आले की, तो ८३ वर्षांचा वृद्ध असून कुलाबा, मुंबई येथे वास्तव्यास आहे. तो जाणूनबुजून फरार झाला नव्हता; न्यायालयाचा समन्स त्याला मिळाला नव्हता, त्यामुळे प्रकरण प्रलंबित असल्याची माहिती त्याला नव्हती. जामीन मंजूर झाल्यास तो खटल्यात पूर्ण सहकार्य करेल व प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहील, तसेच संबंधित गुन्ह्याची कमाल शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी असल्याने जामीन देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.
सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने जॉन पॉलोज अब्राहम याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *