गुहागर : पक्षी मारण्याच्या बंदुकीतून सुटला छरा, निष्काळजीपणामुळे तरुणी गंभीर जखमी

banner 468x60

गुहागर तालुक्यातील वेळंब पिंपळवाडी येथे एका तरुणाच्या निष्काळजीपणामुळे तरुण मुलगी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पक्षी मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीचा ट्रिगर अचानक दाबला गेल्याने त्यातील छरा तरुणीच्या शरीरात घुसला. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कु. मयुरी सखाराम पिंपळे (वय २१, रा. वेळंब पिंपळवाडी, ता. गुहागर) ही शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये मोबाईलचा चार्जर शोधत होती.

त्याच वेळी आरोपी अल्पेश अनंत पिंपळे (वय २८) हा तिच्या पाठीमागून आला. अल्पेशच्या हातात पक्षी मारण्याची बंदूक होती. बंदूक हाताळत असताना त्याने अत्यंत हयगयीने व निष्काळजीपणाने बंदुकीचा ट्रिगर दाबला. त्यामुळे बंदुकीतील छरे थेट मयुरीच्या डाव्या खांद्याला लागून तिच्या शरीरात घुसले. या घटनेत मयुरी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर जखमी मयुरीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मयुरी पिंपळे हिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित अल्पेश अनंत पिंपळे याच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२५ (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *