पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील मुरडे शिंदेवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन परशुराम तत्करी (वय ३२, रा. भडगाव खोंडे) यांनी निलेश बाबाराम खामकर याला दोन हजार रुपये उसने दिले होते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सचिन तत्करी हे पैसे परत मागण्यासाठी निलेश खामकर यांच्या घरी गेले होते. मात्र पैसे देण्यास नकार देत निलेश खामकर याने सचिन यांच्याशी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली.
वाद वाढत असतानाच आरोपी बाबाराम खामकर याने घरातून कोयता आणून सचिन तत्करी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार वार केला. या हल्ल्यात सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. पतीवर झालेला हल्ला पाहून त्यांची पत्नी प्रीती तत्करी त्यांना वाचवण्यासाठी पुढे धावून गेल्या असता, आरोपी बाबाराम खामकर याने त्यांनाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी पहाटे सचिन तत्करी यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी निलेश बाबाराम खामकर आणि बाबाराम खामकर (दोघेही रा. मुरडे शिंदेवाडी) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













