रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथे एक काळजाचा थरार उडवणारा अपघात घडला आहे. पावस ते रत्नागिरी मार्गावर दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट चिरेबंदी दगडांवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना १ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास फणसोप हायस्कूलच्या मागील बायपास रोडवर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, चालक जयप्रकाश चंन्द्रीका यादव (वय ५३) हे आपल्या दुचाकीवरून (गाडी क्र. एम.एच. ०८ बी.जे. ३८५६) भाऊ ओमप्रकाश यादव आणि मित्र संभाजी हुलगे यांच्यासह पावसकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होते.
फणसोप हायस्कूलच्या मागे बायपास रोडवरील कन्हैया कृपा बंगल्यासमोर आले असता, अचानक एक कुत्रा गाडीसमोर आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात जयप्रकाश यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईडपट्टीच्या बाहेर जाऊन चिरेबंदी दगडांवर आदळली.या धडकेत दुचाकीवरील तिघेही जण फेकले गेले. दगडावर आदळल्याने जयप्रकाश यादव (वय ५३) आणि ओमप्रकाश यादव (वय ५१) या दोन्ही भावांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे.
या अपघातात जखमी झालेला फिर्यादी तरुण संभाजी बंकट हुलगे (वय २१, रा. लातूर) यालाही लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्वजण सध्या फणसोप सडा येथे भाड्याने राहत होते. याप्रकरणी जखमी संभाजी बंकट हुलगे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मृत चालक जयप्रकाश चंन्द्रीका यादव याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४:४६ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













