Breaking News
खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक खेड : सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई दापोली : बंदूक चोरीला, तीन महिन्यांनी गुन्हा दाखल! बेडरूममधून 12 बोअरची बंदूक लंपास BIG NEWS सिंधुदुर्ग : इंस्टाची ओळख, एकाच कॉलेजमध्ये एकतर्फी प्रेमदामिनीची हत्या, हत्येचा घटनाक्रम A to Z स्टोरीआरोपीला अटक; हत्येचा घटनाक्रम उघड

रत्नागिरी : उपनगराध्यक्षांना शिवीगाळ, धमकीप्रकरणी नगर अभियंत्याच्या निलंबन-बडतर्फीचा ठराव

banner 468x60

रत्नागिरी नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून नगर अभियंता यतिराज जाधव यांच्यावर कठोर कारवाईचा ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला आहे. अभियंता जाधव यांना प्रथम निलंबित करावे आणि त्यानंतर सखोल चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे, असा ठराव सभेत सर्वानुमते संमत करण्यात आला.

नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेल्या शौचालय दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामांबाबत गेल्या चार वर्षांतील निविदांची कागदपत्रे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी कंत्राटी अभियंत्यांकडे मागितली होती. मात्र चार दिवस उलटूनही कागदपत्रे न मिळाल्याने २२ जानेवारी रोजी त्यांनी नगरपरिषदेत जाब विचारला. यावेळी नगर अभियंता यतिराज जाधव यांनी दालनाबाहेर येत उपनगराध्यक्षांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे नगरपरिषदेत मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप गटनेते राजू तोडणकर आणि शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी यांनी विशेष सभेची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. सभेत भाजप गटनेते राजेश तोडणकर यांनी विषयाचे वाचन करताना सांगितले की, हा प्रकार लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर थेट आघात करणारा आहे. त्यांनी अभियंता जाधव यांच्या निलंबन व बडतर्फीचा प्रस्ताव मांडला.


या प्रस्तावाला शिवसेना (शिंदे गट), भाजप तसेच शिवसेना (ठाकरे गट) अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी ठरावाला मंजुरी दिल्यानंतर आता पुढील निर्णयासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने जितेंद्र विचारे यांनी माहिती देताना सांगितले की, अभियंता जाधव यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे, अभियंता जाधव यांनी आपल्या खुलाशात सर्व आरोप फेटाळून लावत हे आरोप एकतर्फी असल्याचे सांगितले आहे. या आरोपांमुळे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाल्याचा दावा करत, संबंधित दिवशीचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *