गुहागर : ‘देवखेळ’ वेबसिरिजवर तात्काळ बंदी घालण्याची आमदार भास्कर जाधव यांची मागणी, संकासूराला क्रूर दाखवल्याने कोकणात संताप

banner 468x60

कोकणातील शिमगा उत्सवातील पारंपारिक व पौराणिक लोकनृत्य पात्र संकासूर याला कूर व अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखविण्यात आल्याच्या आरोपावरून झी ५ या मराठी ओटीटीवर प्रसारित होत असलेल्या ‘देवखेळ’ या वेबसिरिजवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन दिले आहे.


निवेदनात आमदार जाधव यांनी नमूद केले आहे की, संकासूर हे कोकणातील शिमगा उत्सवातील एक भक्तीमय, पौराणिक आणि पारंपारिक पात्र असून, त्याला शिवाचा अवतार मानले जाते. काळ्या रंगाचा पोशाख, मुखवटा व हातात वेत घेऊन गोमूसोबत गावागावात फिरणारा संकासूर गावकऱ्यांना आशीर्वाद देतो. ही केवळ करमणूक नसून, कोकणची शेकडो वर्षांची श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा आहे.


मात्र, ३० जानेवारी २०२६ पासून झी ५ वर सुरू झालेल्या ‘देवखेळ’ या वेबसिरिजमध्ये संकासूराला खूनी आणि कूर प्रवृत्तीचे पात्र म्हणून दाखविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मालिकेचे चित्रिकरण गुहागर तालुक्यातच झाले असून, संकासूरावर डॉक्युमेंटरी करत आहोत असे ग्रामस्थांना सांगून प्रत्यक्षात वेबसिरिजचे शूटिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.


या प्रकारामुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण कोकणात संतापाचे वातावरण पसरले असून, नमन मंडळे, भजन मंडळांतील कलाकार तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत गुहागर पोलीस ठाणे ते जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही आमदार जाधव यांनी नमूद केले आहे.


काळाच्या ओघात अनेक पारंपारिक कला लोप पावत असताना, कोकणातील कुणबी समाजाने नमन, भजन, संकासूरसारख्या कला जपून जगासमोर नेल्या आहेत. अशा कलांना बदनाम करण्याचा प्रयत्न या वेबसिरिजच्या माध्यमातून होत असल्याने जनभावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सिनेमास्टर्स प्रोडक्शन प्रा. लि. निर्मित ‘देवखेळ’ या वेबसिरिजवर तात्काळ बंदी घालावी, अशी ठाम मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *