दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ

banner 468x60

दापोली तालुक्यातील तेरे वांगणी येथील रहिवासी असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा कामावर जात असताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २७ जानेवारी) सकाळच्या सुमारास घडली. शर्मिला शंकर खांबे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या

आकस्मित निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मिला खांबे या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दापोली बस स्थानकासमोरील शिंदे हॉटेलमध्ये काम करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. कोंडा येथील रस्त्यावरून जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना चक्कर येऊन त्या रस्त्यावर कोसळल्या.

ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांचे पुत्र महेश खांबे यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.


या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अधिक तपास सुरू असून आवश्यक ती वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. शर्मिला खांबे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्या मनमिळावू व कष्टकरी स्वभावाच्या असल्याने परिसरातील नागरिकांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *