संगमेश्वर : धामणी गणातील आपचे उमेदवार सुजित सुर्वे यांचे हृदयविकाराने निधन

banner 468x60

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज छाननीसाठी गुरुवारी देवरुख तहसील कार्यालयात आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील धामणी पंचायत समिती गणातील आम आदमी पार्टीचे उमेदवार सुजित गणपत सुर्वे (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्वांनाच मोठा धक्का बसला असून तालुक्यात शोककळा पसरली आहे.

banner 728x90 banner 728x90

सुजित सुर्वे हे संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक गावचे रहिवासी होते. धामणी गणातून त्यांनी आम आदमी पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी देवरुख तहसील कार्यालयात त्यांच्या अर्जाची छाननी होणार होती. सकाळी ते तहसील कार्यालयात दाखल झाले होते.

मात्र छाननी प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांना अचानक चक्कर येऊन ते कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कोसळले.
घटनेची तीव्रता ओळखून त्यांना तत्काळ उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयातच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांचे पार्थिव मुंबई येथे नेण्यात आले असून उशिरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या सुर्वे यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह राजकीय वर्तुळातूनही तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.


या दुर्दैवी घटनेदरम्यान राजकीय भेद विसरून माणुसकीचे दर्शन घडले. सुजित सुर्वे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कोसळल्याचे लक्षात येताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुन्ना थरवळ यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या दिशेने धाव घेतली. अर्ज छाननी सुरू असतानाच माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या वाहनातून थरवळ यांनी सुर्वे यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

याचवेळी छाननी ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थराडे यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. शृंगारपूरचे सरपंच विनोद उर्फ बाबू पवार यांच्यासह सकाळी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रुग्णालयातील सर्व आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कोणताही राजकीय भेद न ठेवता दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे मानुसकीचे खरे दर्शन घडल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *