दापोली : तालुक्यातील भोपण गावातून नव्या राजकीय चळवळीची सुरुवात, सुबोध मोरे यांची “सोशल रिफॉर्म पार्टी”ची औपचारिक घोषणा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भोपण या छोट्याशा गावातील उच्चशिक्षित व सामाजिक कार्याची तळमळ असलेले तरुण सुबोध मोरे यांनी आज “सोशल रिफॉर्म पार्टी” या नव्या राजकीय पक्षाची औपचारिक घोषणा केली आहे.


समाजातील वंचित, शोषित, कष्टकरी वर्ग, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याच्या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात आली असून, सामाजिक परिवर्तन हेच या पक्षाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा पक्ष महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित असून,
सामाजिक न्याय, समता, बंधुता, शिक्षण, रोजगार, शेतकरी प्रश्न, आरोग्य व्यवस्था आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे सोशल रिफॉर्म पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.

सध्या पक्षाची नोंदणी प्रक्रिया लवकरच भारत निवडणूक आयोगाकडे सुरू करण्यात येणार असून, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धती आणि पुढील कार्यक्रमांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाज परिवर्तनासाठी असले पाहिजे” या ठाम भूमिकेतून सोशल रिफॉर्म पार्टी काम करणार असून, जनतेच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा निर्धार पक्षाचे अध्यक्ष सुबोध मोरे यांनी व्यक्त केला.

तसेच समाजातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती आणि परिवर्तनाची इच्छा असलेल्या सर्व नागरिकांनी या नव्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *