दापोली : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दापोलीत पोलिसांचा कडक पहारा, ठिकठिकाणी नाकाबंदी

banner 468x60

दापोलीत सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी कोकणातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरासह परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दापोली पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.


शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, पर्यटनस्थळे तसेच मुरुड, केळशी, आंजर्ला आदी समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती व वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.


पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस पथके, दंगा नियंत्रण पथक तसेच साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गस्त वाढवण्यात आली असून कोणताही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, नागरिक व पर्यटकांनी नियमांचे पालन करावे,

मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन दापोली पोलिसांकडून करण्यात आले आहे. नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून दापोलीत नववर्षाचे स्वागत सुरक्षित वातावरणात होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *