कलाश्री महोत्सव 2025 अंतर्गत दि. 30 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या दाभोळ केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
विजेत्या संघाला ₹1501 रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कै. रमाकांत तुकाराम मुरकर (माजी चेअरमन, दाभोळ पंचक्रोशी शिक्षण संस्था, दाभोळ) आणि कै. सौ. राजश्री रमाकांत मुरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध बौद्धिक, सांस्कृतिक व कलात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत साजरा होणाऱ्या कलाश्री महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून, या महोत्सवाला दाभोळ पंचक्रोशी परिसरात मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सन 2020 मध्ये दाभोळ केंद्रस्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 2021 मध्ये निबंध स्पर्धा, 2022 मध्ये रंगावली स्पर्धा, 2023 मध्ये समरगीत स्पर्धा, तर 2024 मध्ये दाभोळमधील चार विद्यालयांसाठी चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांचा उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व बौद्धिक क्षमतेला चालना देणे हा आहे.
यंदा आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत दाभोळ केंद्रातील एकूण सात शाळांनी सहभाग नोंदविला. इयत्ता नववी व दहावीच्या गणित, विज्ञान आणि सामान्यज्ञान या अभ्यासक्रमावर आधारित ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली.
स्पर्धेचे परीक्षण लेखक, कवी व राजकीय विश्लेषक सुदेश मालवणकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. कुणाल मंडलिक (रामराजे महाविद्यालय, दापोली | माजी अध्यक्ष, जे.सी.आय. दापोली) यांनी केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण, बहारदार आणि शिस्तबद्ध सूत्रसंचलनामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम नृत्यविशारद नम्रता राऊत यांच्या गणेशप्रार्थनेने झाली. त्यानंतर वैशाली पाथे यांनी सादर केलेल्या सुरेल अभंगाने उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेच्या पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यांमध्ये सर्व संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. विशेषतः दुसरी फेरी अत्यंत अटीतटीची ठरली.
चहापानानंतर झालेल्या तिसऱ्या बझर फेरीत लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळच्या कौशिक फडणीस व कृपा सनकुळकर या विद्यार्थ्यांनी झटपट व अचूक उत्तरे देत आघाडी घेतली आणि अखेरीस विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक — बहुजन हिताय विद्यामंदिर, आगरवायंगणी येथील कोमल पागडे व वैभवी महाडिक यांनी मिळवला. त्यांना ₹1001 व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांक — कै. कमलाकर जावकर माध्यमिक विद्यामंदिर, तेरेवायंगणी येथील गौरव शिगवण व सर्वेश भातडे यांनी पटकावला. त्यांना ₹701 व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व जॉमेट्री बॉक्स देण्यात आले. तसेच शिक्षक प्रतिनिधी, मान्यवर पाहुणे आणि उपस्थितांमधून अचूक उत्तरे देणाऱ्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन दाभोळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळ यांनी केले होते. या उपक्रमासाठी मुरकर, तारकर, राऊत व पाटील परिवार यांचे मोलाचे प्रायोजन लाभले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका प्रियांका वनकर यांनी केली, तर आभारप्रदर्शन गायत्री निमकर यांनी केले. मंडप सजावट व ध्वनीव्यवस्थेची जबाबदारी सिद्धेश कळंबटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी समर्थपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमान्य टिळक विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी आजी-माजी विद्यार्थी, पालकवर्ग तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत अशा स्पर्धा सातत्याने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















