रत्नागिरीकरांच्या अपेक्षित विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा संकल्प नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदग्रहण सोहळ्यात व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि शुभेच्छांच्या वर्षावात नगराध्यक्ष दालनात सोमवारी सकाळी १० वाजता त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नागरिकांचे प्रश्न, सुविधा आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीचा आलेख चढता ठेवण्यासाठी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सोयींचा प्रश्न प्राधान्याने सोडवू, अशा शब्दांत नगराध्यक्षा सुर्वे यांनी शहराला आश्वस्त केले. शहराला नावारूपाला आणण्याच्या प्रयत्नांत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे अपेक्षित सहकार्य करतील, अशी ग्वाही त्यांच्या पिताश्री उद्योजक आण्णा सामंत यांनी दिली. लोकप्रतिनिधींच्या पाठीशी प्रशासन ठाम उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पदग्रहण सोहळ्याला शिवसेना-भाजप युतीचे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवकही उपस्थित होते. महिलावर्गाने दिलेल्या उत्स्फूर्त शुभेच्छांमुळे सभागृहातील वातावरण आनंदी आणि भावनिक दोन्ही झाले. यावेळी सर्व नगरसेवकांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार झाला आणि नंतर नगरसेवकांनी संयुक्तपणे नगराध्यक्षांचा सन्मान करून सहकार्याची ग्वाही दिली. सभागृह भगव्या रंगात न्हाऊन निघाल्याचे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.नगर परिषदेचे अधिकारी जितेंद्र विचारे यांनी प्रास्ताविकात प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले. शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपीन बंदरकर यांनी पारदर्शक, सर्वांगीण आणि जनतेच्या हिताचा विकास करण्यासाठी पाऊल न पाऊल साथ देण्याची भूमिका मांडली.
दि. ३ जानेवारी २०२१ पासून प्रशासकीय ताब्यात असलेला नगरपरिषदेचा कारभार आता पुन्हा लोकप्रतिनिधीकडे आला असून, या पदग्रहणाने रत्नागिरीच्या विकासाला नवे वळण मिळेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष सुर्वेंच्या शब्दांत शहरासाठीचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. यावेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप , बंड्याशेठ साळवी, जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये ,नगरसेवक सौरभ मलुष्टे, प्रीती सुर्वे, निमेश नायर, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, पूजा पवार, उबाठा केतन शेट्ये, अमित विलणकर आदी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















