दापोली : पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू; सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर

banner 468x60

पर्यटनासाठी कुटुंबासह कोकणात आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. मुंबई–कल्याण येथून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दापोली तालुक्यात आलेल्या सकपाळ कुटुंबातील १३ वर्षीय आंचल मदन सकपाळ हिचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदासाठी सुरू झालेला पर्यटनाचा प्रवास अवघ्या काही तासांत शोकांतिकेत बदलला.

banner 728x90 banner 728x90

२५ डिसेंबर रोजी सकपाळ कुटुंब दापोली तालुक्यातील आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आले होते. काही दिवस समुद्रकिनारा व निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर शनिवारी (दि. २७ डिसेंबर) सकाळी परतीच्या प्रवासाची तयारी सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी मुलीला उठवण्यासाठी गेलेल्या पालकांना आंचल शुद्धीवर नसल्याचे आढळून आले. तिचे शरीर थंड पडले होते व दात घट्ट बसलेले दिसताच कुटुंबीय घाबरले.

तात्काळ स्थानिकांच्या मदतीने आंचलला आंजर्ले येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने सकपाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ती आनंदात खेळली होती. कोणतीही तक्रार नसताना झोपलेली आंचल पुन्हा न उठणे, ही बाब कुटुंबीयांसाठी अधिक वेदनादायक ठरली आहे. एकुलती एक लाडकी सुकन्या अचानक हिरावून गेल्याने नातेवाईक अक्षरशः कोलमडून पडले आहेत.

घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, नगरपंचायत अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर व सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव यांनीही रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली.

आंचलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *