खेड : परशुराम रुग्णालयाच्या रुग्णसेवेअंतर्गत सात्विण गावात उपकेंद्राचे उद्घाटन

banner 468x60

घाणेखुंट–लोटे येथील एम.ई.एस. ए.एम. परशुराम रुग्णालय गेली १८ वर्षे खेड–चिपळूण, दापोली, मंडणगड, गुहागर आदी तालुक्यांमध्ये अखंडपणे दर्जेदार आरोग्यसेवा पुरवत आहे. या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून खेड तालुक्यातील सात्विण गावात रुग्णालयाच्या उपकेंद्राचे उद्घाटन गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले.


ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ व परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपकेंद्राचे उद्घाटन नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी सात्विण गावचे सरपंच दिवाळे, उपसरपंच पड्याळ, ग्रामपंचायत सदस्य तटकरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच एम.ई.एस. परशुराम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व एम.ई.एस. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन उत्पात, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अनुपम अलमान, वैद्यकीय अधिकारी, तसेच एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राध्यापक यांचीही उपस्थिती लाभली.


या उपकेंद्रामार्फत प्राथमिक तपासणी, आजारांचे निदान, आरोग्य सल्ला, नियमित तपासण्या तसेच गरज भासल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी परशुराम रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा प्रवास व उपचारावरील खर्च कमी होऊन आरोग्यसेवा त्यांच्या दारातच उपलब्ध होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


सदर उपक्रमाची माहिती एम.ई.एस. आयुर्वेद महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या विद्यार्थ्यांनी गावातील घरोघरी जाऊन दिली. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत रुग्णालयाच्या सामाजिक बांधिलकीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालय प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *