रत्नागिरी शहरातील शांततेला तडा देणारी आणि अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना आज सायंकाळी मांडवीतील भुतेनाका परिसरात घडली. भररस्त्यात दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या रक्तरंजित प्रकारामुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी भुतेनाका परिसरात एक मद्यधुंद तरुण हातात कोयता घेऊन फिरत होता आणि नागरिकांना धमकावत होता. त्याच वेळी बसस्थानकाकडून मांडवीकडे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला त्याने लक्ष्य केले. कोणताही विचार न करता त्या हल्लेखोराने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
हल्लेखोराचे नाव अंकुश मांडवकर असे समजते.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसर बंदोबस्तात घेतला. जखमी तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मांडवीसारख्या गजबजलेल्या भागात, सायंकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी आरोपीची चौकशी आणि पुढील तपास सुरू केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















