राजापूर : रायपाटण हत्याकांडाचे गूढ कायम, मारेकरी मोकाट

banner 468x60

राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील ७४ वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्येचा तपास पंधरा दिवस उलटूनही लागलेला नाही. या खुनामागील नेमके कारण काय आणि ही क्रूर हत्या कोणी केली, याचे गूढ अद्याप कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांच्यासह संपूर्ण उपविभागीय पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे जातीने लक्ष दिले असतानाही मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.


१५ दिवसांपूर्वी रायपाटण गावात ही धक्कादायक घटना घडली होती. एका ७४ वर्षीय वृद्धेची हत्या झाल्याने संपूर्ण तालुका हादरला होता. तेव्हापासून पोलीस यंत्रणा या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कसून चौकशी करत आहे, मात्र मारेकऱ्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. स्थानिक पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखा आणि वरिष्ठ अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाही, तपास मात्र एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेला नाही.
या गंभीर परिस्थितीत, विभागीय अधिकारी लांजा श्री. सुरेश कदम आणि राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी रायपाटण दूरक्षेत्र येथे आले असता ग्रामस्थांना एक महत्त्वाचे आणि संवेदनशील आवाहन केले आहे. कोणताही ठोस धागादोरा मिळत नसल्याने, प्रशासनाने आता जनतेच्या सक्रिय सहभागाची मागणी केली आहे.

लांजा विभागीय अधिकारी श्री. सुरेश कदम यांनी ग्रामस्थांना कळकळीचे आवाहन करताना म्हटले आहे की, या हत्येच्या प्रकरणाबाबत कोणाकडेही छोटीशी जरी माहिती असल्यास, त्यांनी कृपया तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.
यावेळी त्यांनी माहिती देणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.लांजा विभागीय अधिकारी कदम यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित करताना, हा गुन्हा उघडकीस आणणे ही केवळ पोलिसांचीच नव्हे, तर सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या गंभीर घटना पुन्हा घडू नयेत, समाजात शांतता व सुरक्षितता कायम राहावी,

यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी भीतीचे वातावरण निर्माण न करता, तपासात पोलिसांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. जनतेने दिलेल्या माहितीचा योग्य तो मान आणि सन्मान राखला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
एकीकडे वृद्धाच्या हत्येमुळे परिसरात निर्माण झालेले भय आणि दुसरीकडे पंधरा दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा न लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पुढे येऊन प्रशासनाला मदत करणे, हा या हत्येचे गूढ उकलण्याचा मार्ग उरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *