रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे भातशेतीचं नुकसान

banner 468x60

रत्नागिरीत काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका ऐन कापणीला आलेल्या भातशेतीला बसला असून, शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून, ते या नुकसानीमुळे पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले भात पीक कापणीला आले होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकाची कापणी करून ते शेतातच सुकवण्यासाठी ठेवले होते. मात्र, काल रात्रभर कोसळलेल्या पावसाच्या सरींनी या कापणी केलेल्या पिकावरच पाणी फेरले. यामुळे तयार पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदा ऑक्टोबर महिना संपला तरी पावसाचे जाण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.

अजूनही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. निसर्गाच्या याच लहरीपणाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. एकीकडे भातशेतीचे नुकसान होत असताना, दुसरीकडे या बदललेल्या हवामानाचा परिणाम कोकणातील सर्वात महत्त्वाच्या आंबा पिकावरही होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *