मंडणगडमधील क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू, स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला

banner 468x60

अहमदाबादवरून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या उड्डाणानंतर काही मिनिटांतच झालेल्या भीषण अपघातात मंडणगड तालुक्यातील बुरी या गावची रहिवासी असलेली रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

रोशनी सोनघरे ही एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती. तिच्या मृत्यूने बुरी गावासह मंडणगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. मंडणगड तालुक्यातील बुरी गावची रहिवासी आणि एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत असलेली कुमारी रोशनी राजेंद्र सोनघरे (२७) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोशनी सध्या डोंबिवली येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती.

रोशनीने अल्पावधीतच आपल्या कार्यकुशलतेने प्रगतीचा पल्ला गाठला होता, मात्र नियतीने तिचं स्वप्न अर्धवट तोडलं.


ती दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. तिला एअर होस्टेस व्हायचे होते ते तिचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली.


तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. भाऊ विघ्नेश हा शिपिंग कंपनीत कामाला आहे. वडील राजेंद्र सोनघरे टेक्निशियन म्हणून काम करतात. रोशनी या आधी स्पाईस जेट या विमान कंपनीत कामाला होती.

लहानपणापासून तिला एअर होस्टेस व्हायचे होते, ते तिचे स्वप्न होते. आई राजश्री सोनघरे हिच्याशी ती अपघातापूर्वी सकाळी फोनवर बोलली होती, तेच तिचे घरच्यांशी शेवटचे संभाषण झाल्याचे सांगण्यात आले. घटना कळताच तिचे वडील, भाऊ हे अहमदाबाद येथे रवाना झाले आहेत. कंपनीने अद्याप त्यांना याबाबत काहीही कळवले नसल्याचे सांगण्यात आले. तिचे लग्न ठरल्याचीही नातेवाईकांत चर्चा सुरू होती.


आई घरीच असून आईचा भाऊ रोशनीचा मामा प्रवीण सुखदरे यांनी त्याबद्दल माहिती दिली. डोबिवलीत रहायला येण्याआधी ते ग्रँटरोड येथे वास्तव्याला होते, तिचे सर्व शिक्षण तेथेच झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश संपादित केले होते. मध्यमवर्गीय घरातील रोशनी हिच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात आणि डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *