रत्नागिरी : 61 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तोतया पोलिसाला अटक

banner 468x60

दोन कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भीती घालून ६१ लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला रत्नागिरी पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. नेपाल निताई चरण जना (मूळ पूर्व मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सायबर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना आपण मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगितले. २ कोटी रुपयांचा तुमच्या नावावर मनी लॉड्रींगचा व्यवहार झाला आहे, अशी भीती घातली. यावेळी तक्रारदार यांना बँकेमध्ये पैसे जमा करा अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल, अशी बतावणी केली. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार यांनी संशयित आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यामध्ये ६१ लाख १९ हजार ८० रुपये भरले.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयित आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. नेपाल निताई चरण जना यानेच हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

पोलिसांनी गुजरात येथे पथक पाठवून नेपाल जना याच्या मुसक्या आवळल्या. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोलीस हवालदार संदीप नाईक, अमोल गमरे, विक्रम पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल नीलेश शेलार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *