रत्नागिरी : कुवारबाव येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण

banner 468x60

पत्रकार कॉलनी, कुवारबाव येथे एका व्यक्तीला प्रेमसंबंधाच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.


फिर्यादी आनंद आकाराम घोडके (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांच्या घरी झोपलेले असताना आरोपी दत्ता बिरा यमगर, अशोक बिरा यमगर, आकाश शामराव रुकनर आणि त्यांची मुलगी यांनी घरात प्रवेश केला. आरोपी दत्ता यमगर याला फिर्यादीचे त्याची पत्नी रुक्मिणी दत्ता यमगर हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

या संशयातून दत्ता यमगर, आकाश रुकनर आणि स्नेहल घोडके यांनी फिर्यादी आनंद घोडके यांना हाताचे ठोसे आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, आरोपी अशोक यमगर याने फिर्यादीच्या डोक्यात आणि कपाळावर लाकडी बॅटने मारून गंभीर दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आनंद घोडके यांना २३ एप्रिल रोजी सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये आरोपी दत्ता बिरा यमगर, अशोक बिरा यमगर, आकाश शामराव रुकनर आणि स्नेहल आनंद घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *