रेल्वे अपघातात खेडच्या दोन तरुणांचा दुःखद मृत्यू झाला आहे. सुशांत गणपत शिगवण (30) आणि रुपेश गुजर अशी दोघांची नावं आहेत.
खेड तालुक्यातील होडखाड-वरचीवाडी येथील रहिवासी आणि सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत गणपत शिगवण (30) या तरुणाचा गुरुवारी रात्री कुर्ला-मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. दुःखद म्हणजे सुशांतचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
त्याच्या अकाली निधनाने शिगवण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे.होडखाड-वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत शिगवण याचा डिसेंबरमध्ये तुंबाड येथील तरुणीशी झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत विवाह सोहळ्यानंतर कामानिमित्त मुंबईला गेला होता.
कामावरुन परतत असताना त्याचे कुर्ला येथे अपघाती निधन झाले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अशक्य बनले होते. अखेर अपघातस्थळी पडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटवण्यात यश आले. यानंतर तरुणाच्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत रात्रीच गाव गाठले.
सुशांतचा मृतदेह पाहून पत्नीसह आईने फोडलेल्या हंबरड्याने साऱ्यांचेच डोळे पाणावले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास तरुणावर नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.
तर कामानिमित्त डोंबिवली हून मुंबईला निघालेल्या एका डोंबिवलीकर तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकलच्या दरवाजात तरुण उभा होता लोकल गर्दीने खचाखच भरलेली असल्याने त्याचा तोल जाऊन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कोपर ते दिवा स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली असून रुपेश गुजर असे मृत तरुणाचे नाव आहे.
डोंबिवली येथील तुकारामनगरमधील रुपेश हा कुटुंबासह रहातो. गुरुवारी सकाळी 8.30 ते 9 च्या सुमारास त्याने डोंबिवली स्थानकातून मुंबईला जाणारी लोकल पकडली. लोकल गर्दीने भरलेली असल्याने तो दरवाजात लटकलेल्या अवस्थेत उभा होता.
लोकलने वेग पकडताच गर्दीच्या रेट्याने त्याचा हात निसटला आणि त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















