रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर परिसरात घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खूनप्रकरणामागे मैत्रिणीला फितवण्याचा संशय कारणीभूत ठरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याने रागाच्या भरात नव्हे, तर पूर्वनियोजित कट रचून सुरज झोरे याचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी आता उघड होत आहेत.
ही थरारक घटना गुरुवार, २१ मे रोजी कुवारबाव साईनगर येथे घडली होती. या प्रकरणी नंदा फाले (रा. दहिसर, मुंबई) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८), अभिषेक देवानंद राठोड (वय २२) आणि नजीबुल हसीबार शेख उर्फ सोनू (वय २१) या तिघांना अटक केली आहे.
मैत्रिणीवरून निर्माण झाला वाद
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, खूनाच्या दिवशी मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याची मैत्रीणही रत्नागिरीत आली होती. ती आरोपी आणि मृत सुरज झोरे यांच्यासोबत काही वेळ होती. याच दरम्यान सुरजने त्या तरुणीला “म्हात्रेवर भरवसा ठेवू नकोस” असे सांगत तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब सोहमच्या कानावर गेल्यानंतर त्याच्या मनात सुरजबद्दल तीव्र संताप निर्माण झाला.
या रागातूनच सुरजचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यासाठी सोहमने आपल्या साथीदारांची मदत घेत पूर्वनियोजित कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तरुणीसमोरच झाला रक्तरंजित हल्ला
घटनेच्या वेळी सोहमची मैत्रीण घटनास्थळी उपस्थित होती. तिच्यासमोरच आरोपींनी सुरजवर कोयत्याने जीवघेणा हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरज घाबरला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी धावू लागला. मात्र तिघा आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर सपासप वार केले.
मानेवर आणि हातांवर गंभीर वार झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेतही सुरज जीव वाचवण्यासाठी पळत होता. जवळील एका घराच्या कंपाउंडमध्ये उडी मारून त्याने लपण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तिथेही पोहोचले आणि त्याच्यावर पुन्हा कोयत्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केली.
खुनानंतर आरोपीची मैत्रीण अचानक गायब
या घटनेनंतर सोहम म्हात्रे याची मैत्रीण अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती मुंबईत गेल्याचे समोर आले. सध्या पोलिसांनी तिला चौकशीसाठी रत्नागिरीत बोलावले असून तिच्या जबाबातून या प्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
खुनासाठी वापरलेला कोयता जप्त
दरम्यान, पोलिसांनी तपासादरम्यान खुनासाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त केला आहे. आरोपींकडून अधिक चौकशी सुरू असून या खूनप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
या निर्घृण हत्येमुळे कुवारबाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













