Breaking News
दापोली : महिन्यातून एक दिवस गावातच मुक्काम, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा अभिनव उपक्रम चिपळूणमध्ये मोफत डोळे तपासणीसह आरोग्य शिबिर दापोली : दापोलीला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार मुख्याधिकारी धुमाळ यांचा निर्धार, प्लास्टिकविरोधात प्रशासन सतर्क मंडणगड : ‘जर तुम्ही कामे केली तर तुम्हाला ठार मारून टाकू’ थकीत पाणीपट्टी भरण्यास सांगितल्याने 75 वर्षीय महिला सरपंचांना शिवीगाळ, दमदाटी, विकासकामांच्या ठेकेदारांना ठार मारण्याची धमकी, कैसर अब्दुल्ला हर्ले आणि वाहिद राजेखान विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल संगमेश्वर : मोबाईल शाळेत नेल्याच्या कारणावरून पालकांनी रागावले; संगमेश्वरातील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यू

रत्नागिरी : महसुलाची गंगा, पण पर्यावरणाचा बळी, मंडणगड, दापोलीसह राजापुरात 50 वर्षांसाठी खाणपट्टे मंजूर

banner 468x60

कोकणच्या निसर्गरम्य आणि जैवविविधतेने नटलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बॉक्साईट उत्खननाला मंजुरी मिळाल्याने विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंडणगड, दापोली आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये दीर्घकालीन खाणपट्टे मंजूर करण्यात आले असून, या प्रकल्पांमुळे पुढील अनेक दशके या भागांवर खाण कंपन्यांचे नियंत्रण राहणार आहे.


प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, सुमारे साडेचारशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बॉक्साईट उत्खननाचे नियोजन करण्यात आले आहे. मंडणगड तालुक्यातील गुढेघर येथे ९१.५८ हेक्टर क्षेत्रावर ‘मे. इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक’ या कंपनीला २६ ऑगस्ट २०६० पर्यंत खाणपट्टा मंजूर करण्यात आला आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक उत्खनन होणार असून, ‘मे. आशापुरा माईनकेम लिमिटेड’ या कंपनीला रोवले (२१८.२८ हेक्टर) आणि उंबरशेत (९९.८६ हेक्टर) या भागांत २०५५ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.


दक्षिण रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात तर तब्बल ६७३.७२ हेक्टर क्षेत्र उत्खननाखाली येणार असून, या प्रकल्पासंदर्भातील तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे राज्याच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच खनिज-आधारित उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीची शक्यता देखील वर्तवली जात आहे.


मात्र, या विकासकामांची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उत्खननामुळे झाडांची तोड, मातीची धूप, भूजलपातळीतील बदल, जलस्रोतांचे प्रदूषण आणि स्थानिक जैवविविधतेवर होणारा परिणाम याबाबत पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कोकणातील नाजूक पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो, अशी भीतीही वर्तवली जात आहे.


दरम्यान, राजापूर तालुक्यातील नाणार तसेच हमदरा-घोडकेवाडा परिसरात प्रस्तावित खाण प्रकल्पांना स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जनसुनावण्यांदरम्यान ग्रामस्थांनी एकमुखाने या प्रकल्पांना विरोध करत पर्यावरण रक्षणाची भूमिका मांडली आहे. “महसूल वाढविण्याच्या नावाखाली आमच्या निसर्गाचा बळी दिला जाऊ नये,” अशी भावना स्थानिकांमध्ये तीव्र होताना दिसत आहे.


या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही मिळू लागले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी स्थानिकांच्या भूमिकेला समर्थन देत या प्रकल्पाविरोधात उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजापूर तालुक्यातील खाण प्रकल्पांचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनण्याची शक्यता आहे.

एकीकडे विकास, महसूल आणि रोजगारनिर्मितीची आशा, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणाची हाक—या दोन्ही टोकांच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील बॉक्साईट उत्खननाचा मुद्दा तापत असून, पुढील काळात यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *