रत्नागिरी : आरेवारे समुद्रात दुर्दैवी दुर्घटना; कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

banner 468x60

आरेवारे समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आलेल्या कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांच्या समूहावर मंगळवारी दुपारी दु:खाचा डोंगर कोसळला. समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले.

banner 728x90


मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. धुमाळा सावर्डे, कोल्हापूर) असे असून, तर मयूर विष्णू खाडे (वय १६) याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील एका खासगी शिकवणी वर्गातील ४१ विद्यार्थ्यांचा समूह शिक्षकांसमवेत सहलीसाठी आरेवारे समुद्र किनारा येथे आला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास सर्व विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी अतुल सुतार हा पोहत पोहत किनाऱ्यापासून दूर समुद्रात जाऊ लागला. त्याला परत बोलावण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडे त्याच्या मागोमाग गेला.

मात्र समुद्रातील पाण्याचा वेग आणि करंटचा अंदाज न आल्याने अतुलचा तोल गेला आणि तो बुडू लागला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात मयूरदेखील खोल पाण्यात अडकला. दोघेही बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहाध्यायी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकताच घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील तसेच झिप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले.


तथापि, अतुल सुतार याला बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर मयूर खाडे याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आदेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य व समन्वय सुरू केला. दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते रत्नागिरीकडे रवाना झाले होते.

या दुर्दैवी घटनेमुळे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये शोककळा पसरली असून आरेवारे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना समुद्रात उतरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *