राजापूर तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी एक थरारक घटना घडली. पुणे येथून दर्शनासाठी आलेल्या सात भाविकांचे प्राण अक्षरशः थोडक्यात बचावले. त्यांची चारचाकी गाडी तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना दाट रानवेली आणि झुडुपांमध्ये अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील भाविक पांगरे येथील स्वामी शिवानंद टेबे महाराज मठात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी समाधीस्थळालाही भेट दिली. सायंकाळी पाचच्या सुमारास पांगरे पुलालगत उभी केलेली चारचाकी सुरू करताना वाहनाचा हँडब्रेक व्यवस्थित लावला गेला नसल्याने गाडी अचानक मागे सरकू लागली.
वाहनाच्या मागील बाजूस सुमारे ५० फूट खोल दरी असून त्यात मोठमोठे दगड आहेत. गाडी घसरत दरीच्या दिशेने गेली आणि जवळपास ७५ टक्के भाग दरीत झुकला. मात्र, सुदैवाने दाट झुडपे आणि रानवेलींमध्ये वाहन अडकल्याने ते पुढे कोसळले नाही.
घटनेच्या वेळी वाहनात सात जण प्रवास करत होते. प्रसंगावधान राखत सर्वांनी पुढील दरवाजातून बाहेर पडून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली. बाहेर आल्यानंतर दरीच्या काठावर लटकलेल्या वाहनाचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. वाहनाने एक जरी पलटी घेतली असती तर ते थेट दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली असती.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दरीच्या काठावर अडकलेल्या वाहनामुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रानवेली आणि झुडपांमुळेच सात जणांचे प्राण वाचल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. मोठा अनर्थ टळल्याने भाविकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













