गुहागर : पोस्टमनने दीड वर्षात टपालच वितरीत केले नाही, घरी आढळली 2 पोती भरलेली टपाल

banner 468x60

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे पोस्टमनकडून तब्बल दीड वर्षांपासून टपाळ्या वितरित न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीनंतर नव्याने रुजू झालेल्या पोस्टमास्तरांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला.

banner 728x90

वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात कार्यरत असलेला पोस्टमन करण थोरात याच्याकडे आलेल्या टपाळ्या नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याबाबत मागील काही महिन्यांपासून ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. अनेकांना मोबाईल ट्रॅकिंगवर टपाळी ‘डिलिव्हर’ झाल्याचे दाखवत असतानाही प्रत्यक्षात ती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संशय वाढला होता.

या पार्श्वभूमीवर नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित पोस्टमनकडे विचारणा केली. मात्र, त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने पोस्टमास्तरांनी थेट पोस्टमनच्या घरी जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

या पाहणीत पोस्टमनच्या घरी दोन पोतड्या भरलेल्या टपाळ्या आढळून आल्या. या टपाळ्यांमध्ये विविध प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे समोर आले. यात बँकांच्या लिलाव नोटिसा, पासबुक, चेकबुक, आधारकार्ड, एटीएम कार्ड, एलआयसीचे दस्तऐवज, तलाठी कार्यालयाशी संबंधित पत्रे, शाळा व महाविद्यालयांची पत्रे, तसेच जमिनीच्या मोजणीच्या नोटिसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही सर्व टपाळी गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या प्रकरणाची माहिती जिल्हा कार्यालयाला देण्यात आली असून, तेथील वरिष्ठ अधिकारी शनिवारी सकाळी १० वाजता वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात येऊन पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ग्रामस्थांमध्ये संताप; नुकसान भरपाईची मागणी

या घटनेमुळे वेळणेश्वर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांना महत्त्वाच्या टपाळ्या वेळेत न मिळाल्यामुळे आर्थिक व प्रशासकीय नुकसान सहन करावे लागले आहे. काही नागरिकांना जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या नोटिसा वेळेत न मिळाल्याने दोन ते तीन वेळा शुल्क भरावे लागले, तर काहींच्या दागिन्यांच्या लिलावाच्या नोटिसा न मिळाल्यामुळे त्यांचे दागिने लिलावात गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, आधारकार्ड व पॅनकार्ड वेळेत न मिळाल्यामुळे अनेकांची शासकीय व बँकिंग कामे रखडली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पत्रव्यवहार उशिरा मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला.

या सर्व प्रकारामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कोण करणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून, संबंधित पोस्टमनवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोस्ट विभागाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *