दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार

banner 468x60

सागर गोवळे – प्रतिनिधी

शेतकऱ्यांचे मित्र असलेल्या उपयुक्त किडींचे संवर्धन करून रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळण्याचा संदेश देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटातर्फे भाटघर (ता. दापोली) येथे विशेष गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेती आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाची (IPM) माहिती देण्यात आली.

यावेळी कृषीकन्यांनी शेतकऱ्यांमध्ये असलेला “सर्वच किडी पिकांसाठी घातक असतात” हा गैरसमज दूर केला. निसर्गात अनेक किडी या पिकांचे संरक्षण करणाऱ्या असून त्या कीड नियंत्रण, परागीभवन आणि जैविक संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी सांगितले.

मार्गदर्शनादरम्यान लेडीबर्ड बीटल, ग्रीन लेसविंग, प्रेइंग मॅन्टिस, कोळी आणि होव्हर फ्लाय या भक्षक किडी, मधमाशी व बिनडंखी मधमाशी हे मित्र कीटक तसेच ट्रायकोग्रामा या उपयुक्त कीटकांची माहिती देण्यात आली. तसेच भाजीपाला, आंबा, काजू आणि भात पिकांवरील अपायकारक किडींची ओळख करून देत त्यांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात गावातील १५ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी आपल्या शेतातील अनुभव मांडत उपयुक्त किडींच्या ओळखीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे कीड निरीक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.

“रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता नैसर्गिक शत्रू किडींचे संवर्धन केल्यास उत्पादन खर्च कमी होईल, पिके अधिक निरोगी राहतील आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

हा कार्यक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय देसाई, डॉ. समीर काळे, डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *