चिपळूण : बसस्थानकावर भरदिवसा सोन्याचे दागिने चोरी, 7.82 लाखांचा ऐवज लंपास

banner 468x60

चिपळूण शहरातील मुख्य बसस्थानकावर शनिवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधून तब्बल ७ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, काविळतळी येथील रहिवासी वैष्णवी विश्वनाथ शिंदे या शनिवारी दुपारी सुमारे ३:२० वाजण्याच्या सुमारास तिवरे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्या वेळी बसस्थानकावर मोठी गर्दी होती. या गर्दीतच कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्यावर असलेल्या चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये ठेवलेली हिरव्या रंगाची छोटी पर्स अत्यंत चलाखीने चोरून नेली.


बसमध्ये चढल्यानंतर वैष्णवी शिंदे यांनी पर्स तपासली असता त्यातील दागिने गायब असल्याचे लक्षात आले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये एकूण १२ तोळे सोन्याचा समावेश असून त्यात ४५ ग्रॅम वजनाचे जास्वंदीच्या फुलाच्या डिझाईनचे गंठण (किंमत सुमारे ३ लाख १५ हजार रुपये), नेकलेस, दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, पेंडंट असलेली बॉक्स चेन तसेच कानातील कुड्या अशा मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.


या घटनेनंतर वैष्णवी शिंदे यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून (रजिस्टर क्रमांक १००/२०२६) तपास सुरू केला आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्याचे काम सुरू आहे.


दरम्यान, चिपळूण बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी भरदिवसा एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *