रत्नागिरी : जिल्ह्यात सहा महिन्यांत 743 जणांची ऑनलाइन फसवणूक, सायबर भामट्यांनी तब्बल 7.92 कोटी रुपये लंपास

banner 468x60

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्हेगारांच्या कारवायांनाही मोठे बळ मिळत आहे. विविध आमिषे, बनावट संदेश आणि भीतीचे वातावरण निर्माण करून नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या सायबर भामट्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ७४३ नागरिकांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीतून ७ कोटी ९२ लाख ७३ हजार ६३६ रुपये लंपास करण्यात आले असून, ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक सर्वाधिक बळी ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आयुष्यभराची बचत बँक खात्यात जमा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत सायबर गुन्हेगार विविध प्रकारचे डाव आखत आहेत. कधी बँकेची केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली, तर कधी पॅनकार्ड किंवा बँक खाते बंद होणार असल्याची भीती दाखवून त्यांच्याकडून गोपनीय बँकिंग माहिती मिळवली जाते. अनेकदा मोबाईलवर आलेल्या बनावट लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातील रक्कम क्षणार्धात परस्पर खात्यांमध्ये वळवली जाते.

banner 728x90

सायबर भामट्यांकडून नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. वीज बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडले जाईल, बँक खाते किंवा पॅनकार्ड ब्लॉक झाले आहे, अशा प्रकारचे बनावट संदेश पाठवले जात आहेत. याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’, पार्टटाईम नोकरी, कमी गुंतवणुकीत जास्त परतावा, लॉटरी लागल्याचे आमिष, स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून देण्याच्या नावाखालीही अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अलीकडे जनगणनेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक करण्याचा नवा प्रकारही समोर आला आहे.

जिल्ह्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, तक्रारी मिळाल्यानंतर संबंधित बँका आणि आर्थिक संस्थांच्या मदतीने १ कोटी ५९ लाख ७९ हजार ७३२ रुपये गोठविण्यात यश आले आहे. त्यापैकी ७ लाख ७६ हजार ५१८ रुपये तक्रारदारांना प्रत्यक्ष परत मिळाले आहेत. मात्र उर्वरित रक्कम परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी, सीव्हीव्ही, एटीएम पिन किंवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, तसेच संशयास्पद कॉल, संदेश किंवा सोशल मीडियावरील आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणतीही फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधून किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यास आर्थिक नुकसान टाळण्याची शक्यता वाढते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *