दापोली तालुक्यातील मळे गावात तब्बल नऊ दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतरही अनियमित वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी दापोली येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केले. दोन दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मळे गावात ४ जुलै ते १२ जुलै या कालावधीत सलग नऊ दिवस वीजपुरवठा पूर्णपणे बंद होता. त्यामुळे गावातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला, तर शेतकरी, व्यापारी आणि लघुउद्योगांनाही मोठा फटका बसला. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा तसेच इतर अत्यावश्यक सुविधा देखील प्रभावित झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
ग्रामस्थांनी या काळात महावितरणकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र हा आनंद अल्पकाळच टिकला. दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. अखेर ग्रामस्थांनी थेट दापोली येथील महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली.
यावेळी तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी जालगाव विभागाचे सहाय्यक अभियंता वैभव सिंग यांच्याकडे वीजपुरवठ्याच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर माहिती मागितली. मळे आणि परिसरातील नागरिकांना वारंवार वीजखंडितीचा सामना का करावा लागत आहे, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात येत नाहीत, याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन महावितरणने तातडीने आवश्यक दुरुस्ती करून अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुढील दोन दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महावितरण प्रशासनच जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा ऋषिकेश गुजर यांनी दिला.
या प्रसंगी शिवसेना दापोली शहरप्रमुख तथा नगरसेवक संदीप चव्हाण, शहर समन्वयक प्रदीप गमरे, तसेच शशिकांत फिलसे, संतोष फिलसे, अजय फिलसे, संदेश गोसावी, प्रवीण पांदे, विनोद पांदे, अजय बोवने, प्रितेश तेलप आणि आगरवायंगणी येथील विक्रम पवार यांच्यासह मळे गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी यावेळी वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने निकाली काढून भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. आता महावितरण प्रशासन या इशाऱ्यानंतर कितपत तत्परतेने कार्यवाही करते, याकडे मळे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













