पावसाळ्यात उद्भवणारी प्रतिकूल परिस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि धान्य वितरणातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांचे रेशन धान्य आगाऊ उचलून त्याचे वितरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
या निर्णयामुळे पावसाळ्यात लाभार्थ्यांना रेशन दुकानांवर वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच धान्याच्या उपलब्धतेबाबत निर्माण होणारी अनिश्चितता कमी होऊन ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांनाही वेळेत धान्य मिळण्यास मदत होणार आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, धान्याचे वितरण आगाऊ केले जाणार असले तरी ई-पॉस मशीनवर प्रत्येक महिन्याचे व्यवहार आणि लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण स्वतंत्रपणे करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता कायम राहील.
याशिवाय शासकीय गोदामातून धान्य उचलण्यापूर्वी त्याची गुणवत्ता योग्य असल्याची खात्री संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी करणे आवश्यक आहे. तसेच गोदामातून किती धान्य उचलण्यात आले आणि रेशन दुकानांमधून प्रत्यक्षात किती धान्य वितरित झाले, याची माहिती दररोज सायंकाळी ऑनलाइन पोर्टलवर अद्ययावत करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
धान्य वितरणात कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गोदामातून रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचवताना जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या किंवा वितरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे पावसाळ्याच्या काळात राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांना वेळेत धान्य उपलब्ध होणार असून, संभाव्य धान्य टंचाई टाळण्यासही मोठी मदत होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













