चिपळूण तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रविवारी दुपारी सोनगाव परिसरातील नाल्यात काही रासायनिक उद्योगांकडून मोठ्या प्रमाणावर पिवळ्या रंगाचे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील पर्यावरण, नदीतील जलचर आणि मत्स्यसंपत्तीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
लोटे एमआयडीसी परिसरात औद्योगिक सांडपाण्याचा प्रश्न नवीन नसून, यापूर्वीही अनेकदा रासायनिक प्रदूषणाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रदूषणामुळे नदीतील मासे मृतावस्थेत आढळणे, दुर्गंधी पसरने तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचे समन्वयक भरत लब्धे आणि तुळशीराम पवार यांनी तत्काळ सोनगाव येथे धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी दूषित पाण्याचे नमुने संकलित करून पुढील तपासणीसाठी जतन केले. यावेळी सोनगावच्या सरपंच भारती पडवळ, मच्छीमार नेते दिलीप दिवेकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहणीनंतर भरत लब्धे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) चिपळूण येथील प्रादेशिक अधिकारी कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दिसणाऱ्या दूषित पाण्याचा व्हिडिओ पुरावा म्हणूनही मंडळाकडे पाठविण्यात आला. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पंचनामा करावा, दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांचा शोध घ्यावा आणि संबंधित कंपन्यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी सांगितले की, अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे नदीतील मत्स्यसंपत्ती झपाट्याने कमी होत असून मच्छीमारांच्या उपजीविकेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. याशिवाय रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील जैवविविधता आणि मानवी आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता पर्यावरणीय आपत्कालीन परिस्थिती म्हणून पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
एमपीसीबीकडून या परिसराची तातडीने पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, केवळ पाहणी न करता दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रदूषणाचा प्रश्न कायम राहिल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी प्रशासनाला दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











