राजापूर : ओणी–पाचल मार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

ओणी–पाचल मार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (४ जुलै) घडली. नितेश चिमाजी साळवी (रा. हरळ, ता. राजापूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी दुपारी सुमारे १२.३५ वाजण्याच्या सुमारास पाचल येथील बाजारवाडी परिसरात हा अपघात झाला. नितेश साळवी हे त्यांच्या एमएच ०३ एक्स ६९७३ क्रमांकाच्या दुचाकीवरून ओणी–पाचल मार्गावरून प्रवास करत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच ४६ सीयू २११६ क्रमांकाच्या पिकअप टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की नितेश साळवी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच विनायक लिंगायत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी साळवी यांना उपचारासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या मदतकार्यात संतोष गांगण, सुभाष शेटे, महादेव शिंदे आणि दामाजी पांचाळ यांनीही मोलाचे सहकार्य केले.

प्राथमिक उपचारानंतर नितेश साळवी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या अपघाताप्रकरणी पिकअप चालक प्रदीप कमलेश कनोजिया याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण, चालकाचा वेग तसेच इतर बाबींचा तपास पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे हरळ गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, नितेश साळवी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *