रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला न्यायालयीन कोठडी

banner 468x60

लग्नाचे खोटे आश्वासन देत एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित मधुसूदन देसाई (रा. हातखंबा गुरववाडी, ता. जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. २०१६ साली त्याची ओळख पीडित महिलेच्या पतीशी झाली होती. या ओळखीचा आधार घेत त्याने संबंधित महिलेशी मैत्री निर्माण केली. कालांतराने त्याने महिलेचा विश्वास संपादन करत, ‘मी माझ्या पत्नीला सोडणार आहे, तूही तुझ्या पतीला सोडून दे. आपण एकत्र राहू आणि मी तुझ्याशी लग्न करेन,’ असे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या आश्वासनांवर विश्वास ठेवलेल्या महिलेची संशयिताने वारंवार फसवणूक केली. तक्रारीनुसार, २०२२ मध्ये खेडशी चौसोपीवाडी येथे, २०२४ मध्ये भोके येथे आणि २०२६ मध्ये हातखंबा तारवेवाडी येथे संशयिताने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी संबंध ठेवले. तसेच विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या काळात तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दीर्घकाळ लग्नाचे आश्वासन देऊनही संशयिताने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आपली फसवणूक होत असल्याची जाणीव पीडित महिलेला झाली. त्यानंतर तिने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदवली.

महिलेच्या तक्रारीनुसार ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयिताला ताब्यात घेतले. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत असून, घटनेशी संबंधित अधिक माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *