संगमेश्वर : लोवले येथे भीषण अपघात: निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला; दोघे जखमी

banner 468x60

देवरुख–संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वळणावर वाहन चालवताना केलेल्या निष्काळजीपणामुळे किती मोठा अनर्थ ओढवू शकतो, याचे जिवंत उदाहरण या घटनेतून समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचे एलपी वाहन देवरुखहून संगमेश्वरच्या दिशेने येत होते. त्याचवेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा एमएच १० सीआर ३४५६ क्रमांकाचा ट्रक समोरून येत होता. लोवले येथील धोकादायक वळणावर एलपी वाहन चालकाने वाहतुकीचे नियम न पाळता वाहन थेट रस्त्याच्या मधोमध आणले. परिणामी समोरून येणाऱ्या ट्रक चालकाला बाजू देणे अशक्य झाले आणि दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली.


ही धडक इतकी तीव्र होती की ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बॉक्साईटने भरलेला ट्रक थेट रस्त्याखालील सुमारे पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. अपघाताचा आवाज आणि दृश्य पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.


दरम्यान, एलपी वाहनाच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) हा केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत धाडसाने आणि कसरतीने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. या थरारक बचावकार्यामुळे त्याचे प्राण वाचले.
या अपघातात एलपी चालक बालाजी कोंडेवार तसेच ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली आणि वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक तपासात एलपी वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत असून पुढील तपास सुरू आहे.


अपघातानंतर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक आपल्याच बाजूने योग्य वेगात जात होता, मात्र एलपी वाहन चालकाने वळणाचा अंदाज न घेतल्याने हा अपघात घडला. “एकाची चूक आणि दुसऱ्याला शिक्षा” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. वळणांवर वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *