संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुनर्वसन येथे मतदान न केल्याच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारतीय जनता पार्टी (भाजप) तालुकाध्यक्ष रुपेश कदम, हातीवचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुनील शामराव पवार (वय २९, रा. गोठणे पुनर्वसन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० तारखेला रात्री सुमारे ८.३० वाजता ते त्यांचे मित्र अंकुश उंडे आणि नीलेश पवार यांच्यासोबत देवरुख येथील आर. के. हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्याचवेळी गावातील प्रकाश उंडे यांनी निवडणुकीत मदत न केल्याबाबतची माहिती दूरध्वनीवरून रुपेश कदम यांना दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर संबंधितांनी हॉटेल परिसरात येऊन सुनील पवार व त्यांच्या मित्रांना मतदान न केल्याच्या कारणावरून जाब विचारला. वाद वाढत गेल्यानंतर शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या मारहाणीत सुनील पवार यांना दुखापत झाली असून त्यांना उपचार घ्यावे लागले असल्याची माहिती मिळते.
या प्रकरणी रुपेश कदम, नंदकुमार कदम (दोघे रा. हातीव), अक्षय शिंदे, अमित रेवाळे (रा. आंगवली), प्रथमेश धामणस्कर (रा. देवरुख) तसेच अन्य चार ते पाच इसमांविरुद्ध देवरुख पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत जाधव करीत असून, संबंधितांची चौकशी सुरू आहे. राजकीय कारणावरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
झुंडशाही निर्माण होते ती एका दिवसात नाही. सत्तेची, पदाची किंवा राजकीय पाठबळाची मस्ती डोक्यात गेली की कायद्यापेक्षा आपण मोठे आहोत, अशी भ्रमित मानसिकता तयार होते. त्यातूनच “आपण सांगतो तेच अंतिम” अशी अरेरावी जन्म घेते. काही जणांच्या मूक समर्थनामुळे आणि काहींच्या भीतीपोटी घेतलेल्या गप्पीमुळे ही झुंडशाही अधिक बळावते. परिणामतः लोकशाहीचा आत्माच गुदमरतो. मतांच्या राजकारणात मतदाराला धाक दाखवण्याची प्रवृत्ती वाढू लागली, तर उद्या निवडणुका केवळ औपचारिक राहतील आणि स्वातंत्र्याचा अर्थच उरेल का, असा प्रश्न निर्माण होतो. समाजाने आणि पोलिस प्रशासनाने अशा प्रवृत्तीला वेळेवर लगाम घातला नाही, तर सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास ढळण्याचा धोका निर्माण होतो.
दरम्यान, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. तसेच जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी या प्रकाराकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे, तर कायद्याच्या धाकाला दिलेले उघड आव्हान म्हणून पाहणे गरजेचे आहे. कारवाईत ढिलाई दिसली, तर “कायद्यापेक्षा राजकीय वजन मोठे” अशी धारणा बळावण्याचा धोका नाकारता येणार नाही. निष्पक्ष आणि कठोर कारवाई करून गुंडगिरी करणाऱ्यांना स्पष्ट संदेश द्यावा कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. कायदा हातात घेण्याची हिंमत दाखवणाऱ्यांना धडा शिकवला गेला, तरच लोकशाहीवरील विश्वास अबाधित राहील. जिल्हा पोलिस अधीक्षक कायद्याचा धाक दाखवतील की प्रकरणाला केवळ नियमित गुन्ह्याची चौकट मानतील? जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेची प्रतिमा याच निर्णयावर अवलंबून आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















