गुहागर : क्रिकेटच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, “तू कसा क्रिकेट खेळतोस ते बघतोच,” म्हणत मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

गुहागर तालुक्यातील आरे येथे क्रिकेट सामन्यांच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहून क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या एका ३६ वर्षीय तरुणाला तिघांनी संगनमताने अडवून टॉमी आणि दगडाने मारहाण केली. या घटनेत तरुणाच्या नाकाला फॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
फिर्यादी जयेश जनार्दन खोत (वय ३६) हे व्यवसायाने डिलिव्हरी बॉय असून सध्या मुंबईत (कल्याण) वास्तव्यास आहेत.

गावात क्रिकेटची टूर्नामेंट असल्याने ते ७ फेब्रुवारी रोजी आरे गावी आले होते. ८ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास जयेश आणि त्यांचा आतेभाऊ जितेंद्र देवकर हे आरे दत्त मंदिर येथील नदीकाठी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसले होते.

यावेळी आरोपी अविनाश शेटये हा आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीतून (क्र. MH-08-BE-4848) त्याचे मित्र ओंकार बोरकर आणि साईप्रसाद बोरकर यांच्यासह तिथे आला. “तू कसा क्रिकेट खेळतोस ते बघतोच,” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ करत वादाला सुरुवात केली.


वादानंतर आरोपींनी जयेश यांना धक्काबुक्की करत मारहाण सुरू केली. आरोपी अविनाश शेटये याने आपल्या गाडीतील टॉमी काढून जयेश यांच्या कपाळावर आणि उजव्या डोळ्याच्या वर जोरात प्रहार केला. तर आरोपी साईप्रसाद बोरकर याने दगडाने जयेश यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारले आणि तोंडावर ठोसा लगावला. या भीषण हल्ल्यात जयेश यांच्या नाकाला फॅक्चर झाले असून त्यांना टाके घालावे लागले आहेत.


झटापटी दरम्यान फिर्यादी जयेश खोत यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि घड्याळ पडले. त्यापैकी घड्याळ आणि मोबाईल सापडला असला तरी चैन गहाळ झाली आहे. या मारहाणीत जयेश यांचा आतेभाऊ जितेंद्र देवकर यालाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अविनाश शेटये, ओंकार बोरकर, साईप्रसाद बोरकर (सर्व रा. आरे भंडारवाडा) आरोपींविरुद्ध कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *