चिपळूण तालुक्यातील जि. प., पं. स. निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. चिपळूण पं. स.मध्ये तर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यामध्ये पेच निर्माण होणार आहे. पंचायत समितीमध्ये सेना-भाजप युतीच्या 7, अजित पवार राष्ट्रवादीच्या 7, ठाकरे शिवसेनेच्या 4 असे राजकीय बलाबल झाले असून पं. स.वर सत्ता कुणाची या बाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर जिल्हा परिषदेच्या 9 गटापैकी चिपळूणमध्ये शिवसेनेच्या 3, भाजपच्या 2, उबाठा 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागांवर यश मिळविले आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या खेर्डी गटाला सुरुंग लागला असून या ठिकाणी खेर्डी गट आणि गणाचे दोन्ही उमेदवार भाजपाचे निवडून आले आहेत. तसेच वहाळ गटदेखील शिवसेनेने बळकावला आहे.
चिपळूण पं. स.मध्ये सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे असणार आहेत. चिपळूण पं. स.साठी नऊ वर्षांनी निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीत निकाल कोणता लागेल या बाबत मतमतांतरे होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली तर त्या विरोधात शिवसेना-भाजपा युती तर ठाकरे शिवसेनेने देखील निवडणूक लढविल्याने चिपळूणमध्ये तिरंगी लढती झाल्या. या निवडणुकीत शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी पं. स.वर भगवा फडकविण्याचा चंग बांधला होता.
मात्र, त्यांना त्यामध्ये यश आले नाही. पं. स.मध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजप-सेना युतीबरोबर की ठाकरे सेनेबरोबर जातो यावर चिपळूण पं.स.ची सत्ता अवलंबून आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष किंगमेकर ठरला आहे. त्यांच्यासाठी सभापतिपदाचे दोन्ही पर्याय खुले असणार आहेत.
चिपळूण तालुक्यातील जि. प. गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे.
कळवंडे जि. प. गटात शिवसेनेच्या मयुरी शिर्के यांनी पहिलाच विजयी बाण मारला आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे सेनेच्या सानिया तांबे यांनी जोरदार लढत दिली. मयुरी शिर्के यांना 6866 तर सामिया तांबे यांना 2944 मते मिळाली. या ठिकाणी काँग्रेस व वंचित आघाडीनेही निवडणूक लढविली होती. गौतमी चव्हाण यांना 2716, ॲड. गीता जाधव यांना 483 मते मिळाली.
पेढे जि. प. गटामध्ये चुरशीची तिरंगी लढत झाली. या ठिक़ाणी भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना यांच्यात कडवी लढत पाहायला मिळाली. अखेरच्या टप्प्यात मात्र भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या दीप्ती महाडिक यांनी विजय खेचून आणला. त्यांना 4622 मते तर ठाकरे सेनेच्या मानसी भोसले यांना 3765 मते मिळाली, तर काँग्रेसकडून लढलेल्या सान्वी शिंदे यांनी 4431 मते घेतली. येथे आघाडीतील मतविभाजनचा फटका ठाकरे सेनेला बसला. खेर्डी जि. प. गटात राष्ट्रवादीचे अस्तित्व धुळीस मिळाले. या ठिकाणी घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या माजी जि. प. सदस्या दिशा दाभोळकर यांचा भाजपचे उमेदवार व भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या पत्नी रावी मोरे यांनी दणदणीत मतांनी विजय मिळविला. सौ. मोरे यांना 6356, तर विरोधातील दाभोळकर यांना 5899 मते मिळाली. तर ठाकरे शिवसेनेच्या स्वरा जावळे यांनी 1992 मते घेतली. या ठिकाणी भाजपा नेते प्रशांत यादव यांचा करिष्मा दिसून आला.
अलोरे जि. प. गटात सरळ लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेच्या विनया झगडे या विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गायत्री कदम या पराभूत झाल्या. विनया झगडे यांना 6453, गायत्री कदम यांना 6145 मते मिळाली. शिरगाव गटामध्ये चुरशीची लढत झाली. अखेरच्या फेरीपर्यंत मतांची चढाओढ सुरू असताना शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या नेहा रहाटे यांनी विजय खेचून आणला. त्यांना 6858 मते मिळाले तर शिवसेनेच्या दीक्षा कांबळी यांना 5590 आणि तालुक्यात एकमेव उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अमिता मोडक यांना 1014 मते मिळाली. आ. शेखर निकम यांच्या प्रतिष्ठेचा असणाऱ्या सावर्डे जि. प. गटात राष्ट्रवादीच्या माजी सभापती व आमदार पत्नी असलेल्या पूजा निकम यांनी एकहाती सावर्डे गटात दणदणीत विजय मिळविला. सौ. निकम यांना 8237 मते मिळाली तर त्यांच्याविरोधात पाहुण्या उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या धनश्री शिंदे यांना 2618 मते मिळाली तर ठाकरे शिवसेनेच्या ममता खांबे यांनी 1601 मते घेतली.
उमरोली गटामध्ये चौरंगी लढतीत अखेर ठाकरे शिवसेनेने विजय मिळविला. या ठिकाणी शिवसेनेमध्ये झालेली बंडाळी भाजप-युतीला भोवल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि येथे भाजपचे उमेदवार योगेश शिर्के यांचा पराभव झाला. योगेश शिर्के यांना 3893 मते मिळाली, विजयी उमेदवार प्रमोद निवळकर यांना 5792, अजित पवार राष्ट्रवादीचे निलेश चव्हाण यांना 1060 तर बंडखोर उमेदवार योगेश खांडेकर यांनी 1125 मते घेतली आणि यामध्ये ठाकरे शिवसेनेने गड जिंकला. वहाळ जि. प. गटात झालेल्या तिरंगी लढतीमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला. या ठिकाणी शिवसेनेचे संदीप सावंत यांच्या पत्नी शिवानी सावंत यांचा विजय झाला. सौ. सावंत यांना 4179, राष्ट्रवादीच्या आदिती भागडे यांना 2803 तर ठाकरे सेनेच्या पूर्वा जाधव यांना 3790 मते मिळाली.
कोकरे जि. प. गटात आ. शेखर निकम यांचे स्वीय सहायक संजय कदम यांनी विजय खेचून आणला. या ठिकाणी शिवसेनेने प्रतिष्ठेचा केलेली सिद्धार्थ कदम यांचा पराभव झाला. त्यांना 3782, विजयी उमेदवार संजय कदम यांना 5541 तर ठाकरे सेनेचे माजी सभापती संतोष चव्हाण यांना 3511 आणि बसपाचे विलास डिके यांना 160 मते मिळाली.
चिपळूण पं.स.वर त्रिशंकू
चिपळूण पंचायत समितीवर याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सत्तेसाठी जोरदार संघर्ष होता. मात्र, या निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. भाजप-सेना युतीने 7, राष्ट्रवादीने 7 तर ठाकरे सेनेने 4 जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे सत्तेची चावी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. त्यांच्यासाठी दोन्ही पर्याय खुले असून ते कोणाच्या बाजूने कौल देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये आ. शेखर निकम यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे.
चिपळूण पं.स.मध्ये एकूण 18 जागांसाठी निवडणूक झाली. भोम गणामध्ये शिवसेनेचे माजी आमदार व शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी खाडीपट्ट्यातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी झाले असून भोम गणातून शिवसेनेच्या पूजा जवरत या 3292 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्वप्नाली माळी यांना 1662 व ठाकरे सेनेच्या पूजा शिगवण यांना 1076 मते मिळाली. कळवंडे गणात भाजपच्या सायली वाजे यांनी 3249 मते मिळवून विजय मिळविला. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेहा वाजे पराभूत झाल्या. त्यांना 1857, ठाकरे सेनेच्या निकिता निकम यांना 1571 तर काँग्रेसच्या डॉ. मुमताज दलवाई यांना 201 मते मिळाली.
पेढे गणामध्ये तिरंगी चुरशीची लढत झाली. शेवटच्या यंत्रापर्यंत चढ-उतार कायम असताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश आयरे यांनी अखेर 3233 मते घेत यश मिळविले. त्यांच्या विरोधात ठाकरे सेनेचे महेश महाडिक यांना 831 तर राष्ट्रवादीचे मोहन शिंदे यांना 2683 मते मिळाली. दळवटणे गणामध्ये मात्र राष्ट्रवादीने बाजी मारली. या ठिकाणी मेघा इंगावले यांनी 2756 मते घेत विजय मिळविला तर शिवसेनेच्या सायली शिंदे यांना 1825 व ठाकरे सेनेच्या स्वरा शिंदे यांना 1421 मते मिळाली. खेर्डी गणात अत्यंत चुरशीची लढत झाली आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष व माजी पं. स. सदस्य नितीन ठसाळे यांना पराभवाचा धक्का बसला. या ठिक़ाणी भाजपचे तालुकाध्यक्ष व खेर्डी ग्रा.पं. सदस्य विनोद भुरण यांनी 3250 मते घेतली तर नितीन ठसाळे यांना 2681 मते मिळाली तर ठाकरे सेनेचे उमेश खताते यांनी 1386 मते मिळविली. या गणात राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. कापसाळ गणामध्ये ठाकरे शिवसेेनेची जादू चालली. या ठिकाणी ठाकरे सेनेचे सुभाष जाधव विजयी झाले. त्यांना 2586, राष्ट्रवादीचे राहुल कांबळी यांना 1815 तर नवखे उमेदवार असून शिवसेनेचे विनोद हिरे यांनी 2442 मते घेत जोरदार लढत दिली.
अलोरे गणात माजी बांधकाम सभापती शिवसेनेचे विनोद झगडे यांचा विजय झाला. झगडे यांना 3017 तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व कोळकेवाडीचे माजी सरपंच निलेश कदम यांना 2287 मते मिळाली तर ठाकरे सेनेचे विलास तांदळे यांना 500 मते मिळाली. पिंपळी खुर्दमध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली. या ठिकाणी भाजपच्या सुप्रिया देवरूखकर या विजयी झाल्या. त्यांना 3804 तर राष्ट्रवादीच्या पूर्वा भोसले यांनी 2931 मते घेतली.वेहेळे गणात राष्ट्रवादीचे सूर्यकांत खेतले पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. या ठिकाणी भाजप उमेदवार राम राजेशिर्के यांचा पराभव झाला. शिरगाव गणामध्ये अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. या ठिकाणी भाजपने विजयासाठी जोरदार ताकद लावली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात भाजपा उमेदवार ॲड. नयना पवार यांना पराभवाचा धक्का बसला तर त्यांच्या विरोधातील स्नेहा साळवी यांनी विजय खेचून आणला. या ठिकाणी राष्ट्रवादीचे दादा साळवी व माजी पं. स. साळवी बाबू साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांना अखेरच्या टप्प्यात पोफळी व कुंभार्लीच्या मतदारांनी तारले. ॲड. नयना पवार यांना 3170 तर विजयी स्नेहा साळवी यांना 3305 मते मिळाली.
सावर्डे गणात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने बाजी मारली आणि या गणामध्ये आ. शेखर निकम यांचा करिष्ठा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. येथे राष्ट्रवादीचे शौकत माखजनकर 3684 मते घेत मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांच्या विरोधात सेनेचे युवराज राजेशिर्के यांना 1845, ठाकरे सेनेचे सुशिल सावंत यांना 549 मते मिळाली. मांडकी गणात देखील राष्ट्रवादीनेच बाजी मारली. या ठिकाणी राष्ट्रवादीचे व माजी उपसभापती असलेले शरद शिगवण यांनी आपला करिष्मा दाखविला. त्यांना 2822 मते मिळाली. त्यांच्या विरोधातील शिवसेनेचे अनंत खांबे 2088 यांना व ठाकरे सेनेचे शशिकांत राणीम यांना 1381 मते मिळाली.
उमरोली गणात ठाकरे सेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले व या ठिकाणी नवखे उमेदवार गौरव पाटेकर यांनी माजी सभापती व शिवसेना उमेदवार जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांचा पराभव केला. पाटेकर यांना 3433, चव्हाण यांना 1474 तर राष्ट्रवादीचे अरविंद सुर्वे यांना 922 मते मिळाली. गुढे गणातदेखील मशाल प्रज्वलित झाली. अखेरच्या मशिनपर्यंत येथे अटीतटीची लढत होती. या ठिकाणी सुप्रिया वंजारी यांनी 2902 मते घेत विजय मिळविला. त्यांच्या विरोधात भाजपाच्या आराध्या रावणंग यांनी 2461 तर राष्ट्रवादीच्या सायली बंगाल यांनी 508 मते मिळविली.
वहाळमधील निवळी अणि वहाळ गणामध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी माजी सभापती सुरेश खापले यांना मतदारांनी नाकारले. निवळी गणात ठाकरे सेनेच्या संजीवनी खापरे यांनी 2348 मते घेत विजय मिळविला, सेनेच्या शर्मिला देसाई यांना 1923 तर राष्ट्रवादीच्या प्रज्ञा सुर्वे यांना 1418 मते मिळाली. वहाळमध्ये राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेश खापले यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांच्या विरोधातील सेनेचे नवखे उमेदवार संजय जावळे यांनी 2109 मते घेतली व विजय मिळविला.
कोकरे गटावर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. या ठिक़ाणी जि. प. सह पं. स. वर विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या उज्ज्वला घाग 3281 मते मिळवून विजय. विरोधातील शिवसेनेच्या उज्ज्वला चोगले यांना 1604, प्राची घडशी यांना 1674 मते मिळाली. कुटरेमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. राष्ट्रवादीच्या मनस्वी बैकर यांना 2400 मते तर भाजपच्या अक्षता होवले यांना 1650, ठाकरे सेनेच्या निशा घडशी यांना 1880 तर अपक्ष उमेदवार अर्चना रसाळ यांनी 284 मते घेतली.
निवळी गणात ठाकरे सेनेच्या संजीवनी खापरे यांनी 2348 मते घेत विजय मिळविला, सेनेच्या शर्मिला देसाई यांना 1923 तर राष्ट्रवादीच्या प्रज्ञा सुर्वे यांना 1418 मते मिळाली. वहाळमध्ये राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेश खापले यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांच्या विरोधातील सेनेचे नवखे उमेदवार संजय जावळे यांनी 2109 मते घेतली व विजय मिळविला. कोकरे गटावर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. या ठिक़ाणी जि. प. सह पं. स. वर विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या उज्ज्वला घाग 3281 मते मिळवून विजय. विरोधातील शिवसेनेच्या उज्ज्वला चोगले यांना 1604, प्राची घडशी यांना 1674 मते मिळाली. कुटरेमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. राष्ट्रवादीच्या मनस्वी बैकर यांना 2400 मते तर भाजपच्या अक्षता होवले यांना 1650, ठाकरे सेनेच्या निशा घडशी यांना 1880 तर अपक्ष उमेदवार अर्चना रसाळ यांनी 284 मते घेतली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















