खेड तालुक्यात रानडुक्कराची अवैध शिकार करणाऱ्या तिघा संशयितांविरोधात वनविभागाने धाडसी कारवाई करत एक आरोपी अटक केला असून उर्वरित दोघे जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. या कारवाईत आरोपीकडून ९६ जिवंत गावठी बॉम्ब तसेच दोन मृत रानडुक्कर जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दि. २२ जानेवारी २०२६ रोजी खेड वनपरिक्षेत्रातील मौजे निगडे (ता. खेड) येथील बोरज सीमेवर माळरान क्षेत्रात वनविभागाकडून व्याघ्र गणनेचे काम सुरू होते. यावेळी खेड येथील वनपाल व काडवली येथील वनरक्षक यांना राजेश भानुशाली यांच्या मालकीच्या गट क्रमांक ६३/अ मध्ये तीन अनोळखी इसम संशयास्पदरीत्या दोन मृत रानडुक्कर घेऊन जात असल्याचे दिसून आले.
वन कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनपाल व वनरक्षकांनी तात्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर बाबू भागोजी शिंदे (रा. माणी, ता. खेड) यास पकडण्यात वनविभागाला यश आले. मात्र, इतर दोन आरोपी जंगलमय भागात पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडील काळ्या रंगाच्या सॅकमध्ये पिवळसर पिशवीत ९६ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. यासोबतच रानडुक्कर मृत – ०२ जप्त करण्यात आले. हे गावठी बॉम्ब रानडुक्करांच्या शिकारीसाठी वापरण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती असून त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे वनविभागाने सांगितले.
आरोपी बाबू भागोजी शिंदे यास जप्त मुद्देमालासह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग – ०१, खेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची संपूर्ण कारवाई गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) व प्रियांका लगड, सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, उदय भागवत, वनपाल, खेड यांच्यासह वनरक्षक परमेश्वर डोईफोडे (काडवली), अशोक ढाकणे (खवटी), रानबा बंबर्गेकर (तळे), वैभव काट्येखाये (आंबवली) आणि प्रियांका कदम (तपासणी नाका) यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली हे करीत आहेत. पसार झालेल्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून विशेष पथके तयार करण्यात आली असून जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे, त्यास इजा पोहोचविणे, त्याच्या अवयवांची तस्करी अथवा अवैधरित्या वाहतूक करणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे. अशा गुन्ह्यांसाठी आरोपीस सक्षम कारावासासह मोठ्या प्रमाणात द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकते.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांशी संबंधित कोणतेही संशयास्पद किंवा अवैध कृत्य आढळल्यास त्वरित वनविभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १९२६ वर किंवा जवळच्या वनकार्यालयाशी संपर्क साधावा. वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















