चिपळूण नगरपरिषदेची निवडणूक संपताच चिपळूण उबाठाला जबर धक्का बसला आहे.येथील युवती शहर संघटक डॉ.सानिका टाकळे यांनी आपल्या पदासह पक्षाचा देखील राजीनामा देत पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.स्थानिक पातळीवर पक्षाची सुरू असलेली कार्यपद्धती अत्यंत घातक आणि क्लेशदायक आहे.कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडून द्यायचे,ही पद्धत पक्ष आणि कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करणारे आहे.अशा शब्दात डॉ.टाकळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत चिपळूण उबाठामध्ये सरळसरळ उभे दोन गट पडले.एक गट आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी झाला तर दुसऱ्या गटाने विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र निवडणूक लढवली.पक्षाची ताकद विभागली गेल्याने निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले.आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे पक्षाची किमान लाज तरी राखली गेली.
त्यांच्या नेतृत्वाखाली ५ नगरसेवक निवडून आले.तर राऊत गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले.त्यामुळे गटबाजीने उबाठाला अस्मान दाखवले अशी आताची परिस्थिती झाली आहे. डॉ.सानिका टाकळे या उबाठाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवत होत्या.त्यांना पराभव स्वीकारावा लागला.लगेच त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे दिला आहे.मात्र राजीनामा देताना त्यांनी अत्यंत जळजळीत शब्दात आपली खंत व्यक्त केली आहे.
चिपळूण मधील टाकळे कुटुंब नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ असलेले कट्टर शिवसैनिक आहेत.आम्हाला स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला,त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.स्व.शिवसेनाप्रमुखांची शिकवण आचरणात आणून आज तागायत आम्ही काम करत राहिलो.स्वतःच्या उद्योग व्यवसायाकडे दुर्लक्ष करून पक्षाचे अहोरात्र काम केले.असे स्पष्टपणे त्यांनी नमूद केले आहे. चिपळूणात सद्या पक्षाची कार्यपद्धती ज्या पद्धतीने सुरू आहे ते अत्यंत घातक तसेच क्लेशदायक आहे.नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी मरीमरमरायचे,आणि कार्यकर्त्यांची वेळ आली की कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडून द्यायचे ही पद्धत पक्ष आणि कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करणारे आहे.
मी एक उच्चशिक्षित युवती पदाधिकारी म्हणून मला ते न पटणारे आहे.म्हणूनच मला टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे.माझे वडील समीर टाकळे यांनी देखील पक्षासाठी आपले उभे आयुष्य वेचले,स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून दिवसरात्र काम केले,परंतु त्यांचे राजकीय आयुष्य देखील बरबाद झाले.नेहमी जर असेच होणार असेल तर मग पक्षात राहून काम तरी कशाला करायचे.?त्यापेक्षा वेळीच बाजूला झालेले योग्य आहे.त्यामुळेच मी पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे.असेही डॉ.टाकळे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक संपताच युवती शहर संघटक डॉ.सानिका टाकळे यांनी दिलेला राजीनामा पक्षाला चक्क आरसा दाखवणारा ठरला असून उबाठासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.चिपळूणातील अत्यंत कडवट घराणे असलेले टाकळे कुटुंबातून थेट राजीनामासत्र सुरू झाल्याने पक्षासाठी ही आत्मचिंतनाची बाब ठरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















