खेड तालुक्यातील मिर्ले धनगरवाडी येथे गुरे गोठ्याजवळ आल्याच्या किरकोळ कारणावरून एका ४० वर्षीय शेतकऱ्यावर तिघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी तुकाराम भागोजी माने यांच्या घरासमोर घडली. फिर्यादी यांची गुरे आरोपींच्या गोठ्याजवळ गेल्याचा राग मनात धरून आरोपी दिलीप भिकू माने याने सुरुवातीला फिर्यादीला शिवीगाळ करत ‘बघा आता तुमची कशी वाट लावतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी तुकाराम माने आपल्या घरासमोर असताना आरोपी अनंत महिपत माने याने हातातील लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यात प्रहार केला.
या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्याच वेळी आरोपी महिपत घाकटू माने याने बांबूच्या काठीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर मारहाण करून दुखापत केली.
हल्ला करताना आरोपींनी फिर्यादीला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली आणि ‘आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुला खल्लास करून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीनंतर जखमी तुकाराम माने यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अनंत महिपत माने, महिपत घाकटू माने आणि दिलीप भिकू माने या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















